
बोदवड (प्रतिनिधी) – तालुक्यातील येवती येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून मद्यधुंद मुलाने आपल्या जन्मदात्या आईशी वाद घातला. या वादातून त्याने आईच्या डोक्यावर लोणच्याची बरणी मारली. त्यानंतर विळा आणि लोखंडी दाताळ्याने वार करून आईचा जीव घेतल्याची घटना घडली.
अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय ६३) असे मृत महिलेचे नाव असून, गणेश पुरुषोत्तम वाघ असे संशयित मुलाचे नाव आहे. येवती येथे पत्र्याच्या घरात अलकाबाई वाघ या मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना तीन मुली असून, तिघींचेही विवाह झाले आहेत. त्यामुळे आई आणि मुलगा असे दोघेच घरात राहत होते. या घटनेमुळे येवती परिसरात खळबळ उडाली आहे.
गणेश याचे दोनदा लग्न झाले होते. मात्र दारू व गांजा याचे मोठ्या प्रमाणात व्यसन असल्याने त्याच्या एका पत्नीने सोडचिठ्ठी केली, तर दुसरी त्यांच्याकडे राहत नाही आज रात्री चार वाजेसुमारास आरोपी गणेश याने आपली मोठी बहीण मध्यप्रदेश इच्छापूर येथे राहत असलेल्या बहिणीला फोन केला आणि आईने जेवण न दिल्याने मी तिला मारले असे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बहिणीने तिच्या जावाईकडे कामास गेलेला तिचा मुलगा आकाश महाजन याला माहिती दिली. त्यावेळी आकाश व त्याचा मेहुणा पाटखेडा तालुका जामनेर येथून येवती येथे सकाळी पाच वाजता आले. त्यावेळी आजी अंलकाबाई याच्या घरासमोर गर्दी होती. घरात आजी रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण पडलेली होती. अंगावर गोधडी टाकलेली होती. आरोपी गणेश हा बसलेला होता. आरोपी गणेश याने भाचा आकाश याला जेवण नाही दिले म्हणून आईला मारून टाकले, असे सांगितले. याप्रकरणी आकाश महाजन यांच्या फिर्यादी वरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी येवती येथे अवैध दारूचे दुकान मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच जवळच दीड किलोमीटर असलेल्या जामठी येथेही अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनकडून होत आहे.
















