बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातील जामठी येथील ग्रामपंचायत तालुक्यातील चांगल्या उत्पन्नाचे स्रोत असलेली ग्रामपंचायत आहे. तरी देखील गावात नागरी सुविधां विस्कळीत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
जामठी येथील बाजारपेठ मोठी आहे. केवळ बोदवड तालुक्यातीलच नव्हे तर जामठी गावच्या जवळपास असलेल्या जामनेर तालुक्यातील गावांना तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील काही गावांना सुद्धा ही बाजारपेठ सोयीची आहे. तालुक्यातील एकमेव गुरांचा बाजार याच गावातील बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजारात भरतो. दर शनिवारी मोठा आठवडे बाजार भरतो व गुरांचा बाजार यामुळे येथील बाजरापेठेत चांगली उलाढाल होते.परंतू येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांची गैरसोय होत असल्याचा सूर व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जातो.बाजारात मोकाट गुरांचा त्रास भरपूर प्रमाणात व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. पूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने जी नियोजित जागा बाजारपेठेसाठी उपलब्ध करून दिली होती. त्यावर गावातील नागरिकांनी अतिक्रमण झाल्याचे जुने गावकरी सांगतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना जागेचेही कमतरता आहे.
ग्रामपंचायतकडून जी कर आकारणी ठरवली आहे. त्या पेक्षा जास्त कर दुकानदाराकडून आकारणी ठेकेदाराकडून करण्यात आलेली आहे. मात्र, नेहमी बाजारात यावे लागत असल्याने व्यापारी वाद टाळण्यासाठी बोलत नाहीत. बरेच व्यापारी बाजारात येण्यास नाराजी व्यक्त करीत आहे. कर उत्पन्न वसुली चांगली असून सुद्धा बाजारपेठ परिसरात त्यात सुविधा नसल्याने पंचक्रोशितील बाजारात येणारे व्यापारी व छोटी मोठी दुकाने घेऊन येणारे दुकानदार नाराज असतात. त्यामुळे ग्राहकांनासुद्धा खरेदीसाठी कमी पर्याय उपलब्ध होतात.
महिला व पुरुष प्रसाधन गृह नसल्याने अडचण होते.तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याचेही दिसून येत आहे. जामठी ग्रामपंचायतकडे पिण्याच्या पाण्याचे चार स्रोत उपलब्ध असूनही नियोजनाअभावी आठ/ दहा दिवसा आड गावातील नागरिकांना पाणी मिळते. सार्वजनिक सार्वजनिक शौचालयाजवळ साफसफाई नसल्याचे महिलांना त्याचा वापर करण्यास अडचण होते. गावात कर वसुली करण्यास या बाबीमुळे अडचण निर्माण होते. एकूणच चांगली उत्पन्नाची साधने असून सुद्धा नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरी सुविधा पुरवल्या जाऊ शकत नाहीत, असे ग्रामस्थांचे मत आहे.