भुसावळ (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु हे आज (ता. २७) जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले. अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने समज दिली होती. ज्यामुळे त्यांचे नाव सदा राज्यात चर्चेत राहते. आताही याच स्टाईलमुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केल्याचे समोर आले आहे. तर कडू यांच्या या अवतारामुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली असल्याचे पहायला मिळाले.
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, भुसावळ येथे प्रशासकीय आढावा बैठक घेतली. राज्यमंत्री बच्चू कडू हे भुसावळ दौऱ्यावर आले असता येथील प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली या बैठकीला प्रभारी प्रांत कैलास कलगड, आमदार सावकारे व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते. तर भुसावळ विभागाचे प्रांत हे सुट्टीवर गेल्याने प्रभारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘अ’ दर्जाच्या असलेल्या भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच त्यांनी मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. भुसावळ नगरपालिकेच्या वतीने रमाई योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत एकाही लाभार्थ्यांना अद्याप घर देण्यात आलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्याकडून दलितांवर अन्याय केला जात असल्याचे आरोप होत आहेत. असे असताना त्यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल का करू नये असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावरून केवळ रस्त्याची कामांचे प्राधान्य असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना रमाई योजना, पंतप्रधान योजनेचा विसर पडला आहे का असे म्हणत त्यांनी मुख्याधिकार्यांना धारेवर धरत कानउघडणी केली.