धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असतो. तोच समाजाला दिशा देतो आणि संकटकाळी स्वतः पुढे येत समाजाला सावरतोही. कोरोना काळात शिक्षक देवरुप बनून समाजासाठी राबला असे प्रतिपादन पी.आर.हायस्कूलचे निवृत मुख्याध्यापक, साहित्यिक, पत्रकार, व्यंगचित्रकार प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. ते येथील जि.प. शाळा क्र. १ येथे महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित थँक्स टीचर अभियानअंतर्गत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोनि. शंकर शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. त्यानंतर शाळेतील ज्येष्ठ व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ पाटील यांच्यावतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी शंकर शेळके यांनी शिक्षकांच्या कार्याचा उचित शब्दात गौरव केला. आपल्या हस्ते शिक्षकांचा सत्कार होणं हे मी माझे भाग्य समजतो, असे ते म्हणाले. मुख्याध्यापक कवी प्रा. बी एन चौधरी यांनी उपस्थित शिक्षकांना शिकवण्याव्यतिरीक्त इतर कला अंगीकाराव्यात असा सल्ला दिला. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, असं ते म्हणाले. शिक्षकाने आयुष्यभर विद्यार्थी होवून ज्ञान ग्रहण केल्यास तो बदलत्या काळानुरूप स्वतःला सिद्ध करु शकतो, असंही ते म्हणाले. कोरोना काळात शिक्षकांनी जिवाची बाजी लावत केलेल्या असंख्य कामांचा उल्लेख करत अनेक उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन रजनीकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड मुख्याध्यापक मंगला सोनार, नलिनी बाविस्कर, भारती पाटील उपस्थित होत्या.