पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात आला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी राऊत यांनी पहिल्यांदाच ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी केले. तसेच प्रांत अधिकारी विनय गोसावी यांचे स्वागत ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम जिल्हाधिकारी सो. यांनी ई पीक पाहणी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सातबाराचे उतारे देण्यात आले. तसेच गावानजीक असलेल्या शेतकरी विठ्ठल तुळशीराम बडगुजर यांच्या शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष ई पीक पाहणी अंतर्गत त्यांच्या शेतात असलेल्या केळी पिकाची नोंदणी केली. तसेच ई पीक पाहणीची मुदत ही १५ सप्टेंबर होती. परंतु ती आता ३० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. व प्रत्येकाने ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या शेतातील पिकाची नोंदणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील बडगुजर, प्रकाश लोखंडे, पप्पू शर्मा, धनराज मनोरे, देविदास चौधरी, पत्रकार संतोष पांडे, पोलीस पाटील, गोपाल बडगुजर, मंडळ अधिकारी ग्रामसेवक बोरसे, तलाठी, कोतवाल यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.