जळगाव (प्रतिनिधी) महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणेसाठी २० नोव्हेंबर, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत राज्यात महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले. या अभियानातंर्गत बांधण्यात आलेल्या ३ लाख २२ हजार ९२९ घरकुलांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली. तर या कार्यक्रमात जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून श्री. व सौ वाघ यांना घराची चावी व वृक्ष देऊन त्यांना घराचा ताबा देण्यात आला.
या कार्यक्रमास मुंबई येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार आदि मान्यवर उपस्थित होते. तर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
सौ. रत्ना वाघ यांनी शासन व प्रशासनाचे मानले आभार
सुरुवातील आम्ही अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत होतो. स्वत:च्या घराचे स्वप्न होते. ते आज शासनामुळे पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आणि आज ई-गृहप्रवेश झाल्याचा आनंद आहे. याबद्दल मोहाडी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे सौ. रत्ना वाघ यांनी शासन आणि प्रशासनाचे यावेळी आभार मानले.
या लाभार्थ्यांना देण्यात आली घरकुलाची चावी
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांचे लाभार्थी श्री. देवचंद सोनू सुर्यवंशी, संतोष पंडित वाघ, शांताराम रामा तायडे, श्रीमती गंगुबाई देवराम सोनवणे, ज्ञानेश्वर दौलत सोनवणे या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्या हस्ते घराची चावी व वृक्ष देऊन घराचा ताबा दिला.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ५४२५८ तर राज्य पुरस्कृत (रमाई, शबरी, पारधी) योजनेतंर्गत १७२८५ लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांपैकी ५१२३९ लाभार्थ्याना तर राज्य पुरस्कृत योजनांच्या मंजूर लाभार्थ्यांपैकी १५८६० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ३३६२७ तर राज्य पुरस्कृत योजनेतील १०३०९ घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ७९६ प्रलंबित घरकुलांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात डेमो हाऊस बांधकाम पूर्ण झाले असून घरकुल मार्ट सुरु करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक लोखंडे यांनी यावेळी दिली.