जळगाव(प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला सर्वच २० जागांसाठी मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिल्हा बँकेच्या तुलनेत अधिक खर्चीक होणार असल्याचे बोलले जात आहे.
सर्वपक्षीय पॅनलची येत्या दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
जिल्हा बँकेच्या तुलनेत अधिक खर्चीक होणार असल्याच्या भीतीमुळे अनेक तुल्यबळ उमेदवार सर्वपक्षीय पॅनलसाठी आग्रही आहेत.दुसरीकडे जिल्ह्यातील दाेन्ही मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने राष्ट्रवादीतील अनेक उमेदवार सर्वपक्षीय पॅनलच्या तंबुत दाखल हाेण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दाेन दिवसांत याबाबत अधिकृत घाेषणा हाेण्याची शक्यता आहे.
मुंबईत बैठकांचे सत्र आटोपले
जिल्हा दूध संघासाठी उमेदवारी दाखल करण्याची १० नाेव्हेंबर राेजी शेवटची मुदत आहे. भाजपने शिंदेसेनेच्या स्थानिक आमदारांना साेबत घेवून आधीच सर्वपक्षीय पॅनलची घाेषणा केली आहे. या सर्वपक्षीय पॅनलमध्ये जाण्यासाठी राष्ट्रवादीचे पाच ते सहा उमेदवार प्रयत्नशील आहेत. याबाबत मुंबईत बैठकांचे सत्र आटाेपले आहे. येत्या रविवारी पॅनल संदर्भात पुन्हा जळगावात बैठक घेतली जाणार असल्याचे कळते.
पवार दांम्पत्याचे अर्ज दाखल
दूध संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी काॅटन फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी धरणगाव तालुक्यातून तर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका साेनल पवार यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दूध संघासाठी आतापर्यंत केवळ या दाेनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. शुक्रवारी ८५ उमेदवारी अर्जाची विक्री झाली. आतापर्यंत इच्छुक उमेदवारांनी एकुण १६४ अर्ज घेतले आहेत.