जकार्ता (वृत्तसंस्था) शुक्रवारी इंडोनेशियाला भूकंपाचे मोठे धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी होती. एका मोठ्या रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भूकंपामध्ये सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत कोसळली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
रुग्णालय कोसळलं आहे, अशी माहिती बचाव कार्याच्या कामात असलेल्या पथकातील अरिंतो या व्यक्तीने दिलं आहे. मामुजू शहरामध्ये ही दूर्घटना घडली आहे. “या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अडकले आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत,” असंही अरिंतोने म्हटलं आहे. मात्र नक्की किती रुग्ण आणि कर्मचारी या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकलेत यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीखाली १० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमिक अंदाजानुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असणाऱ्या सुलावेसी शहराला सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदतकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला मोठा धक्का जाणवला. ६० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. सात सेकंदांसाठी हा भूकंपाचा झटका जाणवला. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र समुद्रकिनाऱ्यावर सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. गुरुवारीही इंडोनेशियातील काही ठिकाणी भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे झटके जाणवले होते. सोशल मीडियावर या भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात येत आहेत.