अहमदाबाद (वृत्तसंस्था) देशभरातील आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारीच लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. या अधिकाऱ्यांना पाच लाखांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात पकडले आहे.
ईडीच्या अहमदाबाद झोनल कार्यालयात उप संचालक पूरन काम सिंह आणि सहायक संचालक भूवनेश कुमार यांना एका व्यापाऱ्याकडून पाच लाख रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. सिंह आणि कुमार यांनी ७५ लाख रूपयांची लाच मागितली होती. नंतर व्यवहार पाच लाख रूपयांत ठरला, असे अधिकारी म्हणाला. या दोघांना पकडण्यासाठी एस. एस. भादोरिया, हिमांशू शहा, एन. के. वर्मा आणि अभिमन्यू सिंह या अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता. लाचलुचपत विभागाच्या या मोठ्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.