धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने “पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा” आणि “आमची शक्ती, आमचा ग्रह” या संकल्पनांवर आधारित वसुंधरा संवर्धन अभियानाची प्रभावी सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम २२ एप्रिल २०२५ ते ०१ मे २०२५ महाराष्ट्र दिन या कालावधीत राबवण्यात येणार असून, याबाबत शासनस्तरावरून निर्देश प्राप्त झाले आहेत.
मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ एप्रिल रोजी धरणगाव शहरातील तेली तलाव परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत तलाव आणि परिसरातील सुमारे ४ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.
यावेळी नागरिकांच्या सहभागाबरोबरच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी रामनिवास झंवर, कार्यालय अधीक्षक भिकन पारधी, स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील, तसेच इतर कार्यालयीन व सफाई कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
नगरपरिषदेकडून निसर्गाच्या पंचमहाभूतांवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे.