धरणगाव (प्रतिनिधी) आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील केले आहे. ते तालुक्यातील चिंचपुरा येथे आदर्श शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि कोरोना योध्दा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे समाजाच्या उपेक्षित घटकांना ज्ञानदानाचे काम करत असतात. अनेक अडचणींवर मात करून कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावत असतात. आजवर त्यांच्या प्रयत्नांना कुणी कौतुकाची थाप दिली नव्हती. यामुळे स्वाभीमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या संघटनेने त्यांना गौरवान्वीत करण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय कौतुकास्पद असाच आहे. पुरस्कार हे शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी बळ असते. आश्रम शाळेच्या शिक्षकांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करतांनाच आपण त्यांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीसह अन्य समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येत असते. तथापि, आश्रमशाळेतील शिक्षकांना आजवर या प्रकारे सन्मानीत करण्यात येत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन स्वाभीमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी चिंचपुरा येथे आज आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. याच कार्यक्रमात कोरोना काळात खावटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सेवा बजावणार्या कर्मचार्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुधीर तांबे, स्वाभीमानी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत पटेल, सरस्वती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, भुपेंद्र पाटील, टी. पी. पाटील, अशोक पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यांना गौरविण्यात आले
याप्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापक या वर्गवारीतून कर्जाणे ता. चोपडा येथील शरदचंद्रीकाआक्का पाटील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शरद छगन मोरे; प्राथमिक मुख्याध्यापक या वर्गवारीत सत्रासेन ता. चोपडा येथील धनाजीनाना आश्रमशाळेचे जगदीश सिताराम महाजन, प्राथमिक शिक्षक या वर्गवारीत-मनवेल ता. यावल येथील तांबट आश्रमशाळा येथील राकेश चिंधू महाजन, माध्यमिक शिक्षक या वर्गवारीत-कर्जाणे ता. चोपडा येथील शरदचंद्रीका आक्का पाटील आश्रमशाळेचे दिलीप सोमा सावकारे, उच्च माध्यमिक शिक्षक या वर्गवारीत-मेहुणबारे येथील आश्रमशाळेचे उदयभान शांताराम महाजन, क्रीडा शिक्षक या वर्गवारीत-गुढे ता. भडगाव येथील बहिणाबाई महाजन आश्रमशाळेचे शिवाजी देवराम महाजन आणि तंत्रस्नेही शिक्षक या प्रकारात-सत्रासेन ता. चोपडा येथील आश्रमशाळेचे महेशकुमार चंद्रशेखर शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यांचा झाला कोरोना योद्धा म्हणून सत्कार
यासोबत शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये अधिक्षक या वर्गवारीत मोहगन ता. रावेर येथील शशिकांत मुरलीधर भालेराव; महिला अधिक्षीका या प्रकारात-डोमगाव ता. जळगाव येथील सौ. रूपाली सुनील पाटील; कनिष्ठ लिपीक या प्रकारात तरडी ता. पारोळा येथील आश्रमशाळेचे भगवान संतोष पाटील; प्रयोगशाळा परिचर या वर्गवारीत-सत्रासेन ता. चोपडा येथील आश्रमशाळेचे सुकलाल नत्थू पाटील; शिपाई या वर्गवारीत सत्रासेन येथील नरेंद्र उखा महाजन; स्वयंपाकी या वर्गवारीत सतखेडा ता. धरणगाव येथील कांतीलाल छगन पाटील; कामाठी या वर्गवारीत सातगाव डोंगरी ता. पाचोरा येथील सखाराम बन्सी चव्हाण; मदतनीस या वर्गवारीत हातेड बुद्रुक ता. चोपडा येथील गोपाल नाना पाटील आणि पहारेकरी या वर्गवारीत अंतुर्ली ता. अमळनेर येथील प्रवीण रामचंद्र पाटील यांना सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वाभीमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आयोजीत केलेल्या या सोहळ्याचे कौतुक केले. हाच सोहळा शासकीय पातळीवरून आयोजीत करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आश्रमशाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतकर कर्मचार्यांना अतिशय कठीण स्थितीत काम करावे लागते. त्यांना अनेकदा हव्या त्या सुविधा मिळत नाहीत. यातच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न प्रलंबीत असून आपण यासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. तर, ज्ञानदानाच्या कार्याची पावती हे विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशातून प्रतिबिंबीत होत असते. अनेक अडथळे आणि अडचणी आल्या तरी वादळातील पणतीप्रमाणे शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम करावे असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी पाटील यांनी तर सूत्रसंचालन टी.पी. पाटील यांनी केले. शेवटी आभार भूपेंद्र पाटील यांनी मानले.