
नंदुरबार (प्रतिनिधी) – घुली परिसरात दोन कारखान्यांमध्ये तब्बल ४७ लाखांची वीजचोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या धडक कारवाईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत तीन जणांवर नंदुरबारच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घुली शिवारात खुशबु ए. जैन यांच्या ॲल्युमिनियम पावडर कोटिंग कारखान्यात मेसर्स लाब्धी इंटर नावाने वीजजोडणी असून, वापरकर्ता प्रकाश अशोक जैन आहे. महावितरणच्या नंदुरबार ग्रामीण-2 कक्षाचे सहायक अभियंता विनोदकुमार आगरे यांना या कारखान्यात वीजचोरी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर 25 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी नंदुरबार विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, नंदुरबार ग्रामीण-1 उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद काळे, सहायक अभियंता विनोदकुमार आगरे, सहायक अभियंता राकेश चौधरी, बाह्यस्रोत तंत्रज्ञ चेतन भदाणे यांनी सदर ठिकाणी पाहणी केली. विद्युत संच मांडणी तपासली असता ग्राहकाचा वीज वापर व त्यास येणारे वीजबिल यात तफावत दिसून आली. रोहित्रावरून एक केबल मीटरला जोडली होती तर उर्वरित 3 केबल मीटरला न जोडता थेट अनेक विद्युत उपकरणे जोडलेली असल्याचे आढळले. या उपकरणांद्वारे 115 एचपी (85.79 किलोवॅट) इतका वीजभारविद्युतभारित करून वीजचोरी होत होती. या ग्राहकाने अनधिकृतरीत्या 2 लाख 13 हजार 692 युनिट वीज वापरून 41 लाख 92 हजार 930 रुपयांची वीजचोरी केली. वीजचोरीच्या रकमेसह 17 लाख 70 हजार रुपये तडजोड रक्कम असे एकूण 59 लाख 62 हजार 930 रकमेचे बिल भरण्यास वापरकर्ता प्रकाश अशोक जैन याने टाळाटाळ केली. त्यामुळे सहायक अभियंता आगरे यांच्या फिर्यादीवरून खुशबु ए. जैन व प्रकाश अशोक जैन या दोघांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याच पथकाने याच परिसरातील मेसर्स दक्ष इंटर (प्रो.आरती दीपक जैन, वापरकर्ता प्रकाश अशोक जैन) या ॲल्युमिनियम बफिंग मशीनच्या कारखान्यातही तपासणी केली. विद्युत संच मांडणी तपासली असता ग्राहकाचा वीज वापर व त्यास येणारे वीजबिल यात तफावत दिसून आली. या ठिकाणी रोहित्रावरून एक केबल मीटरला जोडली होती तर विद्युत मीटरच्या इनकमिंग टर्मिनलला तीन केबल जोडून मीटर बायपास करून विविध विद्युत उपकरणे जोडलेली आढळली. विविध उपकरणांचा 20 एचपी (14.92 किलोवॅट) इतका वीजभार विद्युतभारित करून वीजचोरी होत होती. या ग्राहकाने अनधिकृतरीत्या 28 हजार 346 युनिट वीज वापरून 5 लाख 41 हजार 340 रुपयांची वीजचोरी केली. वीजचोरीच्या या रकमेसह 3 लाख 50 हजार रुपये तडजोड रक्कम असे एकूण 8 लाख 91 हजार 340 रुपये रकमेचे बिल भरण्यास वापरकर्ता प्रकाश अशोक जैन याने टाळाटाळ केली. त्यामुळे सहायक अभियंता आगरे यांच्या फिर्यादीवरून आरती दीपक जैन व प्रकाश अशोक जैन या दोघांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

















