
जळगाव (प्रतिनिधी) – कामावरुन घरी परतणाऱ्या योगेश जगमल राक्षे (वय २९, रा. पथराड, ता. धरणगाव) या तरुणाला समोरुन येणाऱ्या भरधाव आयशरने जोरदार धडक दिली, या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना मंगळवार दि. २७ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेचार वाजता बायपासवरील पाळधी गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. केन उलटून तरुणाच्या मृत्यूला चार दिवस उलटत नाही, तोच पुन्हा याच ठिकाणी अपघातात तरुण ठार झाल्याने हा नादुरुस्त महामार्ग अजून किती बळी घेणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे
धरणगाव तालुक्यातील पथराड येथे राहणारा योगेश राक्षे हा कानळदा फाट्यावरील एका गोदामात कामाला होता. नेहमीप्रमाणे दिवसभर काम आटोपल्यानंतर तो दुपारी चार वाजेच्या सुमारास (एमएच १९, बीझेड ०६०९) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला. शहराबाहेरुन गेलेल्या पाळधी ते तरसोद बायपासवरुन दुचाकीने जात असतांना पाळधी गावाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर समोरुन पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या भरधाव आयशरने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीचा समोरील भागाचा चुराडा होवून योगेशचा जागीच मृत्यू झाला.
वाहनासह चालक ताब्यात
बायपासवरुन जाणाऱ्यांनी तात्काळ जखमी योगेशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत योगेश राक्षे याला मयत घोषीत केले. दरम्यान, पोलिसांनी धडक दिलेला ट्रक (जी.जे.०४-एडब्ल्यू ९३५३) सह चालक धर्मेंद्र प्रविणसिंग गोयेल, वन ३८, रा. भावनगर, कोलकाता याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
चार महिन्यांपुर्वी झाला विवाह
अपघातात ठार झालेला योगेश राक्षे याचा चार महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. त्याच्या सुखाचा संसार सुरु असतांना कामावरुन परतत असतांना दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातली आणि त्यामध्ये योगेशचा मृत्यू झाला. यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.
आई-वडीलांचा आधार हरपला
बायपासवर योगेश राक्षे या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांसह त्याच्या मित्रांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. योगेशचा मृतदेह बघताच त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते. घरातील कर्ता आणि आई वडीलांचा आधार हरपल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात होती.
बायपास महामार्ग अजून किती बळी घेणार?
एकाच पावसात शहराबाहेरुन गेलेला तरसोद ते पाळधी बायपासच्या कामाचे वाभाडे निघाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महामार्गाचा खचलेल्या भरावसह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे याठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरु आहे. याच एकेरी वाहतुकीमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच चार दिवसांपुर्वी दुरुस्तीचे काम सुरु असतांना क्रेन कोसळून क्रेन चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा महामार्गावर अपघातात तरुण ठार झाल्याने हा बायपास अजून किती जणांचे बळी घेणार असा सवाल संतप्त जळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे.
















