मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे अखेर कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. यानंतर आदित्य ठाकरे पुन्हा कामालाही लागले आहेत.
कोरोनावर मात करुन मुंबईतील वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कमबॅक केलं आहे. सध्याची वाढती कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पाहता वरळी मतदारसंघातील नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० बेड्स तर पोद्दार रुग्णालयात २२५ बेड्सचं अद्यावत सोयीसुविधा असलेलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये जवळपास ७० टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी आदित्य ठाकरे सध्या सुरु असलेल्या राजकारणावर बोलायला विसरले नाहीत. “कोराना काळात जे राजकारण सुरु आहे, ते सुरु राहू द्या, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.” एवढंच नव्हे तर “लसीवरुन जे काही सुरु आहे त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही,” असं वक्तव्य त्यांनी केलं. “लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन,” असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांना २० मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्यावर उपचार सुरु होते. तर आदित्य ठाकरे यांची आई रश्मी ठाकरे यांनाही कोरोना झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृतीही स्थिर आहे.