पिंपरी (वृत्तसंस्था) मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई करत एका हॉटेल कामगाराला अटक केली होती. याच प्रकरणात आता एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक करत त्याच्याकडून तब्बल ४५ कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विकास शेळके (नेमणूक-निगडी पोलीस ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ दरभंगा, रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशालनगर परिसरात शुक्रवारी पहाटे एक जण संशयितरीत्या फिरताना निदर्शनास आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून चौकशी केली. चौकशीत त्याच्याकडील दोन किलो मेफेड्रोन ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात एकूण ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे ४४ किलो ७९० रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नमामी झा याच्याकडे पुढे केलेल्या
चौकशीत या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी शेळके याला अटक केली आहे. तसेच, न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सचिन कदम, पोलीस हवालदार मोरे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
विकास शेळकेकडे कसे आले ड्रग्ज ?
दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी रात्री एका गाडीतून एक पोते पडले. ते कारचालक ईश्वर मोटे यांनी उघडून पाहिले असता, त्यांना तो कंपनीचा कच्चामाल असल्याचा समज झाला. त्यांनी नाकाबंदीतील पोलीस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण यांच्याकडे ते दिले. ढवळेहा आरोपी उपनिरीक्षक शेळके याचा रायटर होता. त्याने शेळके याला पोत्याची माहिती दिली. तेव्हा शेळकेने पोते लपवून ठेवण्याचा सल्ला दिला. ४५ कोटी रुपयांचे हे मेफेड्रोन पाहून शेळकेचे डोळे फिरले. त्याने एका नामचीन गुन्हेगाराकडे आरोपी नमामी झा याला पाठवले. मात्र, त्या गुन्हेगाराने झा याची पोलिसांना टीप दिली.
असे आले शेळकेचे नाव समोर !
वरिष्ठांच्या सूचनेनुसार, सापळा रचून नमामी झा याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शेळकेचे नाव समोर आले. शेळके याच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी कारचालक ईश्वर मोटे यांनाही संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. त्यांनी पोलिसांना सर्व हकिकत सांगितली आहे. या घटनाक्रमानुसार काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून, तपासात तथ्य आढळून आल्याचे सांगितले जात आहे.