लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊमध्ये मंगळवारी रात्री उशिरा भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मुलावर अर्थात आयुष किशोर (वय ३०) याच्यावर दोन्ही बाईकस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मडियाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या छटामील चौकात आयुषच्या छातीत गोळी मारण्यात आली.
आयुषवर फायरिंग करून बाइकस्वार फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आयुषला गंभीर परिस्थितीत ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता त्याची परिस्थिती स्थीर आहे. मुलावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच खासदार कौशल किशोर त्वरित ट्रामा सेंटर पोहोचले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल. तसंच हा प्रकार कुणामुळे घडला, नेमका काय वाद होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. थेट खासदाराच्या मुलालाच गुंडानी लक्ष्य केल्यामुळे सामान्यांमध्ये खळबळ माजली आहे.