यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील मनवेल गावातील एका घरात महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने व उजव्या हातातील चांदीची पाटली तसेच गळ्यातील पोत बळजबरीने हिसकावून महिलेस मारहाण करून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात भरत सखाराम कोळी (वय ४२ रा. मनवेल ता. यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ मे २०२२ रोजी रात्री ९ वाजेच्या पूर्वी दोन अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून त्यांच्या आईच्या कानातील सोन्याचे दागिने व उजव्या हातातील चांदीची पाटली तसेच गळ्यातील पोत बळजबरीने हिसकावले. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी यावेळी भारत कोळी यांच्या आईला मारहाण करून बेशुद्ध केले होते. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.