धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोणे शिवारात क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याची हरभऱ्याच्या बियाण्यात फसवणूक झाली आहे. शेतकऱ्याने बियाण्याची पेरणी केल्यानंतर ८० टक्के पिकच उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केली आहे.
सविस्तर असे कि, जुनोने ता.अमळनेर येथील शेतकरी रामलाल बाबुराव पाटील यांनी प्रताप निंबा पाटील यांचेकडून भोणे ता.धरणगाव येथील १८ बिघे शेती कसण्यासाठी घेतली होती. रामलाल पाटील यांनी या शेतीसाठी फुले विक्रम या वाणाचे बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या एरंडोल विभागातून दि. १२ ऑक्टोबर रोजी खरेदी केले. सदर बियाण्याची पेरणी नुकतेच गिरणेतुन पाटाच्या पाण्याचे आवर्तन प्राप्त झाल्याने या पाण्यावर त्यांनी दि. १० डिसेंबर रोजी लागवड केली. परंतु ८-१० दिवसानंतर देखील बियाण्याची उगवण झाली नाही. तर काही थोड्याफार प्रमाणात संपूर्ण क्षेत्रातील बियाण्यापैकी फक्त २० टक्के उगवण झाली. शेतकऱ्याने यासंदर्भात उगवण न झाल्याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव , कृषी अधिकारी पंचायत समिती, धरणगाव, तालुका कृषी अधिकारी, धरणगाव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.