मुंबई (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत दाखल झालं आहे. आज आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा होणार आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, २५ जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी होणार आहेत. तसेच आज आंदोलक राज्यपालांची भेट घेऊन कृषी कायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत.
केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६० दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आझाद मैदानात ठिय्या दिला आहे. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकरी ‘चलो राजभवन’ म्हणत राजभवनाकडे कूच करणार आहेत. किसान मोर्चाचे प्रतिनिधी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कृषिकायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात हा मोर्चा आहे. या मोर्चाच्या माध्यमातून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबाही देण्यात आला आहे. हे हजारो आदिवासी शेतकरी शनिवारी दुपारी नाशिकमधून निघाले. इगतपुरीमधल्या मुक्कामानंतर रविवारी सकाळी पायी कसारा घाट उतरुन वाहनांतून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमाराला हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यानंतर आज सोमवारी शेतकऱ्यांची भव्य सभा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झालं. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीनं देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकड्या देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.