धरणगाव (प्रतिनिधी) जवाहर रोडवरील श्रीराम मंदिराजवळील घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर भरदिवसा झालेल्या हल्ल्याची गंभीर घटना घडली होती. जळगावमधून पुढे पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आलेल्या लिलाबाई रघुनाथ विसपुते यांचा आज (मंगळवार) दुपारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये उपचार घेत होत्या.
ही धक्कादायक घटना ३ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता घडली होती. काही दिवसांपूर्वी मुलीकडे राहण्यासाठी आलेल्या लिलाबाई या खोलीत विश्रांती घेत असताना एक अज्ञात इसम मागच्या दरवाजातून घरात घुसला आणि त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सलग आठ ते नऊ घाव केले. यामध्ये त्यांचा डावा हात फॅक्चर झाला असून एक बोटही तुटले होते. गंभीर अवस्थेत त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जळगाव व पुढे पुणे येथे हलवण्यात आले.
दरम्यान, हल्ल्यावेळी घरात इतर सदस्य हॉलमध्येच उपस्थित होते. नातवाने एक अनोळखी व्यक्ती पळताना पाहिली होती, मात्र तो फरार होण्यात यशस्वी ठरला. विशेष म्हणजे, घरातून कोणतीही चोरी वा दागिने गायब नसल्याने हा हल्ला पूर्वनियोजित होता की अन्य काही कारण होते, याचा तपास अद्याप सुरू आहे.
लिलाबाईंच्या मृत्यूनंतर धरणगाव पोलिसांकडून या प्रकरणात आता कलम ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस तपास गतीने सुरू आहे.