सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्यातील लोणंद येथे एसटी आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघंही आई वडिलांची एकुलती एक मुलं होती. त्यामुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोटारसायकलवरील ओंकार संजय थोपटे, पोपट थोपटे, अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे बु. थोपटेवाडी, ता. पुरंदर), अशी मयत तरुणांची नावं आहेत.
आपल्या मोटारसायकलवर ओंकार थोपटे, पोपट थोपटे, अनिल थोपटे हे तिघं मित्र कामानिमित्त लोणंद या ठिकाणी गेले होते. मात्र, घरी परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. लोणंद -निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच २०बीएल ४१५८) व निरेकडून लोणंद निघालेली मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ आरव्ही ३१५८) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. बसच्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. दरम्यान, या घटनेनंतर थोपटेवाडी ग्रामदैवत असलेली हनुमान यात्रा उत्सव थांबविण्यात आला.