धुळे (वृत्तसंस्था) तुम्ही कधी धावत्या कारच्या बोनेटवर साप आला असं ऐकलं का? नाही ना.. पण राष्ट्रीय महामार्गावर एक साप कारच्या बोनेटवर अवतरल्यामुळे कार चालकाला तब्बल तीन किलोमीटर तसाच प्रवास करावा लागल्याच्या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही थरकाप उडवणारी घटना मध्यप्रदेशहून येत असताना शिरपूरजवळ घडली. मध्यप्रदेशकडून परिवारासह येत असताना सापाविषयी गप्पा चांगल्याच रंगलेल्या असतांना चालत्या कारच्या बोनेटवर भलामोठा साप अचानक येतो. हा साप आल्यामुळे कारमधील सर्व जण भयभीत झाले. या सापाने वाहनामध्ये बसलेल्या सर्वांनाच चांगलेच घाबरवून सोडले.
तब्बल तीन किलोमीटरपर्यंत हा साप कार वरतीच बसून होता. सापाच्या संपूर्ण हालचालींवर कारमध्ये बसलेल्या प्रत्येकाचे बारीक लक्ष होते. या सापाला मारायचे नाही, या उद्देशाने कार चालकांने तब्बल तीन किलोमीटर अंतर सापासोबत पार केल्यानंतर एका सर्विस स्टेशनजवळ कार नेऊन थांबवली.
कारवर साप असल्याचे बघून सर्विस सेंटर जवळील काही जणांनी सापाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु कार चालकाने त्यांना तात्काळ थांबविले व सापाला मारण्यापासून रोखले. सर्विस सेंटरवरील नागरिकांनी सर्पमित्राला याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर सर्पमित्राने मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या सापाला पकडले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून गाडीवर बसून प्रवास करणाऱ्या सापाला जीवनदान दिले आहे.