ठाणे (वृत्तसंस्था) ठाण्यात काल झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव व रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाषणापूर्वी राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली होती. राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरुन आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सार्वजनिक कार्यक्रमात तलवार उंचावल्याप्रकरणी मोहित कंबोज, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्यावरही अशाच स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळं मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
















