मुंबई (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढील आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. राज्याच्या उत्पन्नात १ लाख ५६ हजार कोटींची तूट झाली आहे. कोरोना संसर्गाचा राज्याला मोठा फटका बसला आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत ८ टक्के घसणर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी २०२०-२१ ची आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. अजित पवारांनी सादर केलेल्या अहवालानुसार, कृषी आणि त्यासंबंधी क्षेत्रांमध्ये ११.७% वाढीचा अंदाज, तर उद्योगात ११.३%, सेवा क्षेत्रात ९%, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात ११.८% आणि कंस्ट्रक्शन क्षेत्राच १४.६% घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नात एक लाख ५६ हजार ९२५ कोटींची घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय, २०२०-२१ च्या बजेटमध्ये ३,४७,४५७ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रत्यक्षात मात्र एप्रिल-डिसेंबर २०२० दरम्यान १,७६,४५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, म्हणजे, आपक्षेपेक्षा ५०.८ टक्के कमी महसूल मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशापेक्षा जास्त असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. २०१९-२० मध्ये २०११-१२ च्या आधारे महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई २,०२,१३० रुपये होती. तर यूपीमध्ये ६५,७०४ रुपए आणि मध्य प्रदेशात ९९,७६३ रुपये होती. यावर्षी महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई कमी होऊन १,८८,७८४ कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.
४० हजार ५१५ कोटी रुपये पीक कर्ज वाटप
२०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर वित्तीय संस्थेद्वारे ४० हजार ५१५ कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाले. २०१९-२० मध्ये ते २८ हजार ६०४ कोटी इतकं होतं. २०२०-२१ मध्ये सप्टेंबर अखेर ३० हजार १४ कोटी रुपये कृषी मुदत कर्ज वाटप करण्यात आले तर २०१९-२० मध्ये ३४ हजार ४२७ कोटी होता.
पशुसंवर्धन क्षेत्रात ४.४ टक्के वाढ अपेक्षित असून वने आणि लाकूड तोडणी ५.७% वाढ अपेक्षित आहे. तसंच मत्स व्यवसाय आणि मत्स शेती २.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. वस्तू निर्माण उणे ११.८ टक्के, बांधकाम उणे १४.६ टक्के त्याचा परिमाण उद्योग क्षेतात उणे ११.३ टक्के वाढ अपेक्षित आहे.