भोपाळ (वृत्तसंस्था) भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ३६ मुलांना वाचवण्यात यश आलं आहे.
मध्यप्रदेशातल्या भोपाळ इथं कमला नेहरु रुग्णालयातल्या लहान मुलांच्या कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आत्तापर्यंत ४ मुलांचा मृत्यू झाला असून ३६ मुलांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चिल्ड्रन्स वॉर्ड आहे. आग लागल्यानंतर रुग्णांना स्ट्रेचरवरुन बाहेर काढण्यात येत होतं. मात्र, या रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा मात्र गोंधळ उडाल्याचं दिसत होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती हाती येत आहे.
या घटनेबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र प्रकृती गंभीर असलेल्या बालकांचा जीव वाचवता आला नसल्याची खंत त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून बोलून दाखवली.