जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्त्या आणि लोक संघर्ष मोर्चाच्या प्रमुख फायरब्रॅड नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी आज खासदार राहुल गांधींच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रतिभाताईंच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस एक बुस्टर डोस मिळाला आहे.
आज दि 20 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत प्रतिभाताई शिंदे यांनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला असून लवकरच त्यांना महाराष्ट्रात महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कळते. प्रतिभाताई शिंदे यांनी सातत्याने आदिवासींच्या प्रश्नासाठी संघर्ष केला आहे. तसेच मराठा, मुस्लीम, अनुसूचित जाती-जमातीतील एक मोठा वर्ग प्रतिभाताई शिंदे यांच्या पाठीमागे आहे. विविध आंदोलनातून त्यांनी त्यांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यासह जिल्ह्यात तयार केला आहे. प्रतिभाताईंच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय गणित बदलणार असून खासकरून रावेर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसला मोठे बळ मिळणार आहे.
धर्मनिरपेक्षता व राज्यघटना सुरक्षित ठेवण्याची ताकद कॉंग्रेसमध्ये : प्रतिभाताई शिंदे !
मला आपण सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ती म्हणून ओळखता. आज मी माझ्या या संघर्षाच्या प्रवासाचे एक नवे पर्व सुरु करीत आहे. समाजपरिवर्तनाचा लढा अधिक मजबुतीने पुढे न्यायचा असेल तर राजकीय व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही याची खात्री पटल्याने मी राजकीय पक्षप्रवेश करीत राजकीय जीवनाची सुरवात करीत आहे.
मी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ या लोकचळवळीच्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेतील मानवतावादी मूल्यांवर आधारित लोकाभिमुख परिवर्तनासाठी सतत कार्यरत आहे. आदिवासी, दलित, बहुजन वर्गातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, व शोषित घटकांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या सहभागातून स्वातंत्र्यानंतरच्या संसदबाह्य लढ्यातील माझे योगदान आजपर्यंत करत आले आहेच. परंतु आता प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेत सहभागी होवून पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करत या शोषित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, मी ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ (काँग्रेस) पक्षात प्रवेश करत आहे.
माझ्या सर्व कामात माझ्या पाठीशी सक्रीयपणे आपण जसे नेहमीच उभे रहात मला सहकार्य करीत आला आहात तेच सहकार्य तुम्ही मला या पक्षीय राजकारणाच्या कार्यात द्याल व माझ्या पाठीशी उभे रहाल म्हणून या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आपणा सर्वांशी संवाद साधते आहे.
माझा खरं तर शालेय जीवनापासूनच कार्यकर्ती म्हणून प्रवास सुरु झालेला. त्या वेळी ‘राष्ट्र सेवा दल’, ‘छात्रभारती’ या पुरोगामी परिवारात मी माझ्या कार्यकर्तीपणाचे धडे गिरवलेत. माझा गाव, माझा समाज, व गावपंचक्रोशी सत्यशोधक चळवळीचा वारसा जपणारी होती. त्यामुळे छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई, डॉ.बाबासाहेब, यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला. मार्क्स-फुले-आंबेडकरवाद मांडणारे कॉ. शरद पाटील माझ्याच शेजारच्या तालुक्यातले. त्यांच्या व्याख्यानांमधून जातीअंत, मातृसत्ताक व्यवस्था, ब्राम्हणी व अब्राम्ह्णी दृष्टीकोन यांचा परिचय होत गेला. साक्री तालुका हा शरद जोशींच्या शेतकरी चळवळीचा भक्कम बालेकिल्ला. या चळवळीच्या पडझडीतून शेतकऱ्यांचे प्रश्नही उमगत गेले. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यातून पर्यावरण आणि विकासाची धोरणे याबाबतीतल्या गुंतागुंत लक्षात आली. सातपुडा पर्वतरांगामधील व तापी नर्मदेच्या खोऱ्यातील गुजरात व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात विखुरलेला आदिवासी समूह आणि नैसर्गिक संसाधने यांचे महत्व आणि मानवी मूल्यांवर आधारित संस्कृती अस्मितेचा लढा यातून खूप काही शिकायला मिळालं. पुरोगामी विचारांची कार्यकर्ती म्हणून माझ्या पूर्णवेळ कामात झोकून घेण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न शासनापुढे मांडण्यासाठी मला या साऱ्या वातावरणाची मोठी मदत झाली आणि पाठबळ मिळाले. आणि यातूनच ‘लोकसंघर्ष मोर्चा’ ही जनचळवळ उभी राहिली.
लोकचळवळींनी संसदबाह्य दबावगट म्हणून काम करावे व राजकारणा पासून दूर राहावे – ७० च्या दशकातील जेपी आंदोलनातून पुढे आलेली -ही भूमिका साधारणपणे भारतातील सर्वच जनसंघटनांची राहिली आहे. मात्र ‘लोकसंघर्ष मोर्चा’ म्हणून आम्हाला ही भूमिका पूर्णपणे कधीही मान्य नव्हती. लोकांच्या प्रश्नांवर काम करतांना जिथे धोरणे ठरवली जातात त्या लोकप्रतिनिधींच्या – ग्रामपंचायत असो किंवा लोकसभा – या सभागृहांमध्येही तुम्हाला गेलं पाहिजे; आणि लोकाभिमुख धोरणे तयार करण्यात प्रत्यक्ष सहभागी झाले पाहिजे या भूमिकेतून संघटना नेहमीच राजकीय भूमिका घेत आली आहे. आज जेव्हा देश एका भयंकर संक्रमणकाळातून जातो आहे त्यावेळी माझा लोकांमध्ये असलेला जनसंपर्क, येथील प्रशासन व शासन यांच्यावर प्रभाव टाकून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची संघटना म्हणून असलेली आमची ताकद आणि तिच्या मर्यादा यांचा विचार करून मी प्रत्यक्ष राजकीय पक्ष प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेते आहे.
आज देशात स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा होत असतांना आपली मानवी व संविधानिक मूल्ये सध्याच्या राजवटीत पायदळी तुडवली जाण्याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत. लोकशाही अवकाश आवळला जातोय, लोकशाही यंत्रणांचे खच्चीकरण सुरू आहे. अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर सुरूच आहेत. त्याचबरोबर या देशातील लोककल्याणकारी योजना, अर्थ व्यवस्था मोडकळीस काढून देशाचे अर्थकारण मूठभर भांडवलदारांच्या हातात सोपवण्याचे षड्यंत्र सुरु आहे. त्यामुळे बेरोजगारी व विषमता शिगेला पोचते आहे. देशातील शेतकरी, छोटे उद्योग, व व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्वच स्तरांवर नैराश्य आणणारी पीछेहाट सुरू आहे.
भारतातील समाजसुधारकांनी केलेले प्रबोधन व सामाजिक परिवर्तन आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून समता, सामाजिक न्याय व बंधुभाव धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद या मूल्यांवर आधारित भारतात झालेली क्रांती उलथवून टाकत देश पुन्हा उच्चवर्णीय मूठभरांच्या वर्चस्वाखाली आणण्याची प्रतिक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न हा फार पूर्वीपासून सुरु होता. या कट्टरतावादी शक्तींना ही प्रतिक्रांती यशस्वी करण्यात काहीसे यश आल्याचे चित्रही आज सभोवताली दिसू लागले आहे. ही प्रतिक्रांती लोकशाहीच्या आडून प्रत्यक्षात हुकुमशाहीच्या माध्यमातून शासकीय व्यवस्थांचा वापर करत अधिक वेगवान करण्याच काम सुरु आहे. ही भविष्यातील मध्यकालीन अराजकतेची आणि येऊ घातलेल्या वर्णव्यवस्थावादी हुकुमशाहीची सुरवात आहे. अशा वातावरणात आपण पुन्हा एकदा लोकशाहीतील निवडणुकीच्या कसोटीला सामोरे जाणार आहोत. २०२४ मधे महाराष्ट्रातील प्रगतीशील परंपरा मानणारे नागरिक, कार्यकर्ते, चिंतनशील व्यक्ती, काही बदल घडवू शकतील का? या देशाला पुन्हा ख-या अर्थाने संवैधानिक वाटेवर आणू शकतील का? हा सर्वांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे. या हुकुमशाही शक्तींना सत्तेतून पायउतार करणे त्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी जनतेचा दमदार, सक्रिय हस्तक्षेप राज्यभर जाणत्या नागरिकांकडून निर्माण करता येईल यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून राजकीय पक्षातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होणे मला महत्वाचे वाटते.
स्वातंत्र्य मिळाल्याला आता ७५ वर्षे पूर्ण झालीत. देशातील कृषी संस्कृती जपणारा ग्रामीण भाग, नैसर्गिक संसाधनांवर आधारित आदिम संस्कृती जपणारे आदिवासी समूह, यांना त्यांचे हक्क मिळावेत. त्यांच्या विकासात विस्थापनाची व संस्कृती विघटनाची असुरक्षितता नसावी. येथील विविध जाती, धर्म व पंथांच्या समूहांना, महिलांना या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी होता यावे. विविधतेतून एकता जपणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद अधिक सशक्त बनावा. येथील नैसर्गिक संसाधने- जल, जंगल, जमीन यांचा विनाश करून पर्यावरण प्रदूषित करणारा औद्योगिक विकास हा पर्यावरण पूरक असावा. येथील गरीब, कष्टकरी व बहुजन,मागासलेल्या घटकांना अन्न व उपजीविकेची हमी मिळावी. या सर्व मुद्द्यांसाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’चा नेहमीच आग्रह राहिला आहे आणि आम्ही त्यासाठी प्रत्यक्ष कामही केले आहे. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. समता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय या मूल्यांना जपणाऱ्या या देशात अनपेक्षितपणे हुकुमशाही राजवट आल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण होते आहे. या देशातील जाती धर्मांमधला द्वेष वाढतो आहे. भय आणि भूक या बाबतीत येथील समाजमानस चिंतीत झाले आहे. सर्वत्र एक अदृश्य आणिबाणी लादली गेली आहे. याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या जनसंघटनांना दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. या देशाची अर्थव्यवस्था मूठभरांच्या हातात केंद्रित होते आहे. येथील जंगले, नद्या, जमिनी यांच्यावर ज्यांचे हक्क आहेत त्यांच्याकडून हिसकावून घेत खुल्या बाजारात त्यांची विक्री सुरु आहे. शिक्षण, आरोग्य, व रोजगार यांचे खाजगीकरण करून या बाबतीत सरकारची असणारी कल्याणकारी भूमिका सरकारच नाकारते आहे. यासाठी आणली गेलेली धोरणे, कायदे यांना जे कोणी विरोध करतील त्यांना क्रूरपणे चिरडले जाते आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांनी कायदा व सुव्यवस्था राबवायची आहे त्याच यंत्रणांना दमनासाठी वापरले जाते आहे.
गेल्या ७५ वर्षात सर्व कांही आलबेल होते असे नाही. परंतु ७५ वर्षात जनतेच्या प्रश्नांवर न्याय देणारी धोरणे व कायदे बनविण्यात यशही मिळाले आणि यात काँग्रेस पक्षाने नेहमीच पुढाकार घेतला, अशा मागण्यांना न्यायही दिला. आतापर्यंत सत्तेत आलेल्या येथील बहुतांश राजकीय पक्षांनी किमान त्यांच्या लोकांप्रति असणाऱ्या जबाबदारीचे भान पाळले आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी राज्यघटनेतील तरतुदी, विविध राजकीय स्वायत्त संस्था, प्रशासन, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे यांवर वर्चस्व गाजवण्याबाबत काही मर्यादा पाळल्या आहेत. त्या जेव्हा जेव्हा धोक्यात आल्या किंवा त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न येथील सत्ताधाऱ्यांनी केला तेव्हा तेव्हा येथील जनसंघटनांनी त्याच्या विरोधात संवैधानिक मार्गाने आवाज उठवला आणि सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम केले आहे. तेवढे स्वातंत्र्य सर्वसामान्यांना देणारी लोकशाही येथे होती. त्यामुळे आज जेव्हा राज्यघटनाच धोक्यात आली आहे तेव्हा मला कॉंग्रेस पक्ष महत्वाचा वाटतो.
या देशातील अल्पसंख्याक, दलित, आदिवासी समूहांवर एक विशिष्ट सांस्कृतिक दहशतवाद लादला जातो आहे. येथील ओबीसी, बहुजनांच्या हिंदुत्वावर ब्राम्हणी विकृतीकरण लादून उच्चवर्णीय वर्चस्ववाद आणला जातो आहे. हा देश जो गेल्या ७५ वर्षात पुरोगामी विकासाकडे वाटचाल करत होता, कॉंग्रेसने भारतीय लोकशाही व मानवतावादी मूल्यांचा मान राखत यात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. येथील विविधता आणि धर्मनिरपेक्षतेचे वातावरण त्यांनी कधी गढूळ होवू दिलेले नाही. मात्र भाजपा व आरएसएस सारख्या कट्टरतावादी शक्तींनी हा देश पुन्हा मध्ययुगीन कालखंडात असणाऱ्या सामंतवादी व धर्मांध अराजकतेकडे माघारी फिरवला आहे. या देशात जाणीवपूर्वक जातीयवादी वातावरण निर्माण करत मूठभरांच्या हातात व्यवस्था केंद्रित करू बघणाऱ्या शक्तींना पुन्हा वेसण घालणे गरजेचे आहे. त्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी येथील जनतेला संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. २०२४ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुका या परिवर्तनासाठीची मोठी संधी आहे. देशाच्या पातळीवर राष्ट्रीय पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष हाच एक सशक्त पर्याय आहे या निष्कर्षाला मी आले आहे.
आज लोकशाही, धर्मनिरपेक्षता व राज्यघटना यांना सुरक्षित ठेवायचे असेल, भाजपला सत्तेतून दूर करायचे असेल तर त्यासाठी ही सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे ठरवण्याची ही वेळ आहे. आणि अशावेळी जे राजकीय पक्ष भारतीय राज्यघटनेला मानतात; ज्यांचा मानवी मूल्यांवर विश्वास आहे अशा भक्कम पक्षाची गरज आहे. आज देशात भाजपा व आरएसएसच्या षड्यंत्राला रोखण्याची ताकद कॉंग्रेस पक्षात आणि त्यांच्या सहभागातून निर्माण झालेल्या इंडिया आघाडीत शिल्लक आहे, असा माझा विश्वास आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’तून याची प्रचिती आलेली आहेच. त्यासाठीच या पक्षाच्या मुख्यप्रवाहात सहभागी होवून मी राजकीय पक्षकार्यकर्ती म्हणून माझा नवा प्रवास सुरु करीत आहे. माझ्या या निर्णयाशी आपणही सहमत असाल अशी अपेक्षा करते. ‘लोकसंघर्ष मोर्चा’ ही लोकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोकांची चळवळ आहे. ती पुढे तशीच सुरु राहील. लोकांमधून उभे राहिलेले सामूहिक नेतृत्व ती चळवळ पुढे नेतील. आपण पूर्वी मला जसे सहकार्य दिलेत तसेच यापुढेही आपण मला द्याल यावर माझा विश्वास आहे.
– प्रतिभा शिंदे (९७६७४५७०६२)