धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण आणि गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यानंतर झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.मिलिंद डहाळे हे होते. त्यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत घवघवीत यश मिळवणारी कु.तनिष्का सुरेंद्र सोनार हिचा सत्कार करण्यात आला. तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल डॉ.बी.डी.शिरसाठ, एका वर्षात तीन आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार पटकाविल्या बद्दल मनोज परदेशी आणि जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीच्या निवडणूकीत भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल संदीप घुगे यांचा डॉ.डहाळे यांच्या हस्ते बुक बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन एनसीसी मेजर डी.एस.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ यांनी केले. यावेळी सत्कारार्थींच्या वतीने डॉ.बी.डी.शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाढदिवसानिमित्त डी.के.चौधरी व एन.सी.पाटील यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. पर्यवेक्षककैलास वाघ यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.