जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवार रात्रीपासून पाऊस सुरु आहे. हतनूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणाचे सर्व म्हणजे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. रावेर तालुक्यातील काही गावात पुराचे पाणी शिरले आहे.
ऐनपूर ता. रावेर परिसरात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात मध्यप्रदेश येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. रावेर तालुक्यातील तापी नदीचे बक वॉटरचे पाणी खालील गावातील घरामध्ये शिरल्याने काही गावातील कुटुंब स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
या गावांमध्ये खिरवड कुटुंब 20 (जिल्हा परिषद शाळा), ऐनपुर 25 (कुटुंब जिल्हा परिषद शाळा), नींबोल 4 कुटुंब (नातेवाईकांकडे), निंभोरा शिम 15 (कुटुंबं नातेवाईककडे), धुरखेडा 3 कुटुंब (जिल्हा परिषद शाळा), अशा पद्धतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तापी नदीला महापूर आला आहे. यामुळे अंतुर्ली ते पातोंडी या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे पातोंडी गावाचा संपर्क तुटला असल्याचे कळते.