जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय व्हावा यासाठी (NCP) राष्ट्रवादी युवा किसानतर्फे महादेवाला दुग्ध अभिषेक करत साकडे घालण्यात आले. माजी मत्री एकनाथ खडसे यांच्यावर मागील तीन– साडेतीन वर्षांपासून जो अन्याय होत आहे. त्यावर वाचा फोडण्यासाठी या संकल्प पूर्तीची अभिषेक करण्यात आला.
शिवाय विधान परिषदेसाठी आज मतदान होत असून यात एकनाथ खडसे यांचा विजय होवून त्यांना लवकरात लवकर मंत्रीमंडळात स्थान मिळावे. तसेच त्यांच्यावर असलेल्या ईडीसह इतर चौकशींचे आरोप हे लवकरात लवकर नष्ट व्हावे; यासाठी महादेवाला साखडे घालण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवा किसानचे जिल्हाध्यक्ष सुरज नारखेडे, ललित नारखेडे, सिद्धार्थ सपकाळे, उमाकांत पाटील, चेतन इंगळे, मंगेश भोले, पंकज व्यास, राकेश चौधरी, आकाश रत्नपारखी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
बोदवड ते शिरसाळा पायदळ वारी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनाथ खडसे यांचे बोदवड तालुक्यातील असंख्य खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी बोदवड ते शिरसाळा मारूती मंदिर पायदळ वारी करून हनुमानाला साकडे घातले. मंदिरात महाआरती करून हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करत भरपूर मतांनी निवडून येऊ दे व मंत्री पद मिळू दे अशी शिरसाळा मारूतीच्या चरणी प्रार्थना केली.