जळगाव ( प्रतिनिधी ) : अचूक वीजबिलासोबत दिवसा वीजवापराचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी महावितरणने टीओडी मीटर बसविण्याच्या कामाला गती दिली आहे. परिमंडळात टप्प्याटप्याने सर्व वर्गवारीतील (कृषी ग्राहक वगळून) ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत परिमंडलात ४ लाख ३० हजार ४२ मीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यात २ लाख ६४ हजार २१३, धुळे जिल्ह्यात १ लाख १ हजार ५२३ व नंदुरबार जिल्ह्यात ६४ हजार ३०६ स्मार्ट मीटर बसवले आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्मार्ट टीओडी मीटरद्वारे 000000 स्वंयचलित मीटर रीडिंग होत आहे. त्यामुळे ग्राहकांना अचूक बिले मिळत असून प्रत्यक्ष वीजवापर मोबाईलवर पडताळता येतो. त्यामुळे वीजवापरावरही थेट नियंत्रण ठेवता येते. अचूक आणि वेळेत बिल देण्यास उपयुक्त ठरणारे स्मार्ट मीटर हे वीज ग्राहकांसाठीपर्याय नसून अत्यावश्यकच आहेत. स्मार्ट मीटरमुळे सरासरी वीजबिल, मीटर रीडिंगच झाले नाही. या व अशा तक्रारी निकालात निघणार असून, स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळणार आहे. एकंदरितच वीजग्राहकांसाठी संपूर्ण फायद्याचे असणारे मीटर बसवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग’ नुसार वीजग्राहकांना दर्जेदार व विनातक्रार सेवा देण्यासाठी स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार आहेत. वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर लावणे हा शासन पुरस्कृत आणि शासन अनुदानित असलेला उपक्रम पूर्ण देशभरात राबवण्यात येत आहे. ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.















