जळगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या कुसुंबा गावात दाम्पत्याच्या निर्घृण खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे चार जणांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याच्या खून प्रकरणाचा चार दिवसांत उलगडा झाला आहे. सोमवारी पहाटे चार वाजता चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात सुधाकर रामलाल पाटील (वय ४०, चिंचखेडा, ता. जामनेर), देविदास नामदेव पाटील (वय ४०), अरुणाबाई गजानन वारंगे (वय ३०) व चंद्रकला सुभाष धनगर तिघे (रा. कुसुंबा, ता. जळगाव) याचा समावेश आहे. अरुणाबाई व देविदास यांना कुसुंब्यातून तर सुधाकर याला चिंचखेडा येथून ताब्यात घेण्यात आले.
व्याजाच्या पैशाचे तसेच जुन्या वादातून खून केल्याची कबुली चौघांनी दिली आहे. अरुणाबाई हिने आशाबाईकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. आशाबाईच्या अंगावरील दागिनेही हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली होती तर गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.