धरणगाव (प्रतिनिधी) शेतीचे बक्षीस पत्र करून देतांना एकाची फसवणूक केल्याप्रकरणी धरणगाव न्यायालयात दुय्यम निबंधक आणि एका स्टँप वेंडरविरुद्ध फसवणूकीबाबत फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, बांभोरी बु. ता. धरणगाव जि.जळगाव येथील रहिवासी एकनाथ साहेबराव पाटील यांचे स्वतःचे, त्यांचे २ भाऊ, आई व १ बहिण तसेच काका यांच्या नावे अविभक्त व अविभाज्य शेत मिळकती होत्या. सदर शेत मिळकतीच्या ७/१२ उताऱ्यावर एकूण ६ लोकांचे नावे असतांना एकनाथ साहेबराव पाटील यांच्या काकांनी त्यांचे क्षेत्र हे बक्षीस पत्राने त्यांच्या काकूंच्या नावे करून दिले. परंतू सदर बक्षीस पत्र करून देतांना एकनाथ साहेबराव पाटील यांचे उताऱ्यावर नाव असतांना देखील त्यांची संमती न घेता फक्त एकनाथ साहेबराव पाटील यांचे २ भाऊ, आई व १ बहिण यांच्याच संमती घेवून बक्षीस पत्रचा दस्त करून दिलेला होता.
सदर बाब एकनाथ साहेबराव पाटील यांना माहित झाल्यानंतर तसेच सदर बक्षीस पत्राचा दस्त हा दत्तात्रय आधार चौधरी (स्टॅप वेंडर) यांनी तयार करून व म. दुय्यम निबंधक सो दुय्यम निबंधक कार्यालय, धरणगाव यांच्याशी संगनमत करून नोंदविलेला होता. त्यामुळे एकनाथ साहेबराव पाटील यांनी दत्तात्रय आधार चौधरी (स्टँप वेंडर) व जी.पी. राठोड (म. दुय्यम निबंधक सो. दुय्यम निबंधक कार्यालय, धरणगाव) यांना तक्रारी अर्ज देवून केलेले बक्षीस पत्र रद्द करावे, अशी विनंती केली. परंतू दत्तात्रय चौधरी व जी. पी. राठोड यांनी सदर बक्षीस पत्र रद्द न केल्यामुळे व दत्तात्रय चौधरी व जी.पी. राठोड यांनी संगनमताने व एकविचाराने एकनाथ पाटील यांची फसवणूक केली म्हणून त्यांनी पोलीस निरिक्षक धरणगाव व पोलीस अधिक्षक जळगाव यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला. परंतू पोलिसांनी देखील कोणताही गुन्हा दाखल केला नाही किंवा काहीही कायदेशीर कारवाई केली नाही. म्हणून एकनाथ साहेबराव पाटील यांनी धरणगाव येथील न्यायालयात त्यांच्याविरुद्ध भा.द.वि. कलम ४२० १२० (ब) ४६७, ४६८, ४७१ सह ३४ प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला. दरम्यान, फिर्यादी एकनाथ साहेबराव पाटील यांच्यातर्फे अॅड. राहूल एस. पारेख धरणगाव यांनी काम पाहिले.