धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील महावीर कॉटनची साडेतीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मनमानच्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, संजय समीर ओस्तवाल (वय ४८, रा.महावीर कॉटन, धरणगाव) यांच्या मालकीची महावीर कॉटन नावाने नोंदणीकृत भागीदारी संस्था आहे. सन २०२० पासून तर आजपर्यंत दिनेश कांतीलाल लुणावत (शुभम ट्रेडींग, सुभाष रोड मनमाड ता. नादगांव जि. नाशिक) याने घेतलेल्या कायदेशीर हमीने शुभम राजेंद्र लुणावत (सुभाष रोड मनमाड ता. नादगांव जि. नाशिक) याने संजय ओस्तवाल यांच्याकडून एकत्रीत ६८ लाख ६७ हजार २४२ रूपये किंमतीचा मका खरेदी केला होता. त्यापैकी केवळ ३८ लाख रक्कम ओस्तवाल यांना दिली होती.
ओस्तवाल यांच्याकडून मका खरेदी करुन त्याबाबतचे संपुर्ण दस्त मे.महावीर कॉटनकडे उपलब्ध असूनही दिनेश लुणावत आणि शुभम लुणावत यांनी ३० लाख ६७ हजार २४२ एवढी रक्कम देण्यास नकार देवून टाळाटाळ केली. दोघं संशयित आरोपींनी मका खरेदी करते वेळी संगममताने ओस्तवाल यांचा विश्वास संपादन करुन खोटे अश्वासन देत ओस्तवाल यांच्या महावी कॉटन फर्मचे नुकसान व्हावे या उद्देशाने संगणमताने कट कारस्थान रचून फसवणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनिरी अमोल गुंजाळ हे करीत आहेत.