
जळगाव (प्रतिनिधी) – हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून २ जणांची १ कोटी २३ लाख रुपयात फसवणुक करणाऱ्या दिपेश कमलेश रुपानी (रा. गणपती नगर, जळगाव) याला अटक केली आहे. चौकशीत त्याने जळगावातील इतर दोघांना १२ लाखात गंडविल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २६ ऑक्टोंबर पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली.
हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे अमिष दाखवून २ जणांची १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी दीड वर्षापासून पसार असलेल्या दिपेश रुपानी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १९ ऑक्टोबर रोजी अटक केले होते. सुरुवातीला संशयिताला दि. २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीदरम्यान त्याच्या चौकशीतून अनेक मुद्दे समोर येत आहेत. नागरिकांना गुंतवणूक करण्याचे सांगत त्याने त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावरही रक्कम स्वीकारली. या बँक खात्यांचा पोलिस पथकाकडून तपास सुरू आहे.
फसवणूक झालेल्यांनी दिली पोलिसांना माहिती
दिपेश याला अटक केल्यानंतर फसवणूक झालेले इतर जणही पुढे येऊ लागले आहेत. यामध्ये जळगावातील दोन जणांनी आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन फसवणुकीची माहिती दिली. त्यानुसार या दोघांची प्रत्येकी ६ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. दिपेश रुपानी याच्या पोलिस कोठडीची मुदत २३ ऑक्टोबर रोजी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता २६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
















