नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताची जमीन चीनच्या ताब्यात दिल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या आरोपावर संरक्षण मंत्रालयाने उत्तर दिलं आहे. भारताचा भूभाग पँगाँ सरोवराच्या फिंगर ४ पर्यंत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. भारतानं पूर्व लडाख मधील कोणताही भूभाग चीनला दिलेला नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं दिलं आहे. पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागं घेण्यावर चीनशी सहमती झाली आहे.
भारताच्या नकाशात चीनच्या ताब्यात असलेला भारताचा भूभागही आहे. हा भूभाग सुमारे ४३,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ इतका आहे, असं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देपसांग, हॉट स्प्रिंग आणि गोगरासह अन्य प्रलंबित समस्यांवर दोन्ही देशांच्या सैन्य कमांडरांमध्ये होणाऱ्या आगामी बैठकीत चर्चा केली जाईल असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. ‘पूर्व लडाख सेक्टरमध्ये देशाचे राष्ट्रीय हित आणि भूभागाचं प्रभावी संरक्षण करण्यात आलं आहे. सरकारनं सशस्त्र दलाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. ज्यांना जवानांच्या बलिदानावर शंका आहे, ते त्यांचा (हुतात्मा सैनिकांचा) अपमान करत आहेत’, असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य हटवण्याच्या बाबतीत काही मीडिया आणि सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं टिप्पणी करण्यात आली आहे, याची मंत्रालयानं माहिती घेतली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना योग्य परिस्थितीची माहिती दिली आहे.
भारताच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष ताबा रेषा ही फिंगर ४ पर्यंत नाही तर फिंगर ८ पर्यंत. याच कारणाने फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करण्याची मागणी भारत सातत्याने करत आला आहे आणि चीनबरोबरही हा करार आहे. हॉट स्प्रिंग्स गोगरा आणि डेप्सांग व्हॅलीमधील वादही सोडवला जाईल. पाँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य माघारीनंतरच्या ४८ तासांनी या भागांमध्येही पूर्वीची स्थिती बहार करण्यावर चर्चा सुरू केली जाईल, असं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. भारतानं कोणताही दावा सोडलेला नाही, उलट LAC वर कोणत्याही प्रकारच्या एकतर्फी बदलांना रोखलं आहे,’ या स्पष्ट शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं भारताचा भूभाग चीनच्या ताब्यात असल्याचा दावा फेटाळला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जमिनीचा भाग चीनला दिला, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. भारताची जागा फिंगर ४ वर आहे, तर भारतीय लष्कर फिंगर ३ वर का आले? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. ‘पंतप्रधानांनी फिंगर ४ चीनला का दिलं? आपल्या सैनिकांनी कैलास रेंजवर ताबा मिळवला होता. मात्र ते आता तिथून मागे येत आहेत, हे असं का होत आहे? नरेंद्र मोदी यांनी चीनपुढे शरणागती पत्कारली आहे,असा दावाही राहुल यांनी केला होता.