जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील गिरड लखवी नाला (धोबी घाट) अपहार प्रकरणी भडगाव प.स.चे विस्तार अधिकारी टी.पी मोरे यांनी खोटा अहवाल दिल्याप्रकरणी संबंधित गुन्ह्यामध्ये सहआरोपी करावे अन्यथा उच्चन्यायलात जाण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस सेवा फाउंडेशनचे रावेर विभागीय अध्यक्ष सद्दाम शहा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते सद्दाम शहा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भडगाव तालूक्यातील गिरड येथील लखवी नाला (धोबी घाट) येथील सिमेंट बांधकामाच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू पं.स. भडगावचे विस्तार अधिकारी टी.पी. मोरे यांनी शासकीय रकमेचा अपहार केलेल्या संशयितांना अभय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे 120B नुसार या गुन्ह्यामध्ये त्यांचे नाव देखील समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा औरंगाबाद हायकोर्टात दाद मागावी लागेल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते सद्दाम शहा यांनी दिला आहे.
म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत कामात मोठा भ्रष्टाचार करून खोटा अहवाल दिल्याबद्दल विभागीय चौकशी समितीच्या अहवाल नुसार शाखा अभियंता एस.बी. गायकवाड लघुसिंचन विभाग प.स. चाळीसगाव व एन.एस. महाजन ग्राम विकास अधिकारी, गिरड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे होते. परंतू संबंधितांना संरक्षण देण्याचे काम प. स. भडगाव विस्तार अधिकारी टी.पी. मोरे यांनी केले असून त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत 21 डिसेंबर 2022 रोजी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना तक्रार केली आहे.
प. स. भडगाव विस्तार अधिकारी टी.पी. मोरे यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांचे दि. 19 मार्च 2021, दि. 26 सप्टेंबर 2019, दि. 19 ऑक्टोबर 2021 व जिल्हाधिकारी जळगाव यांचे दि. 05 एप्रिल 2021 नुसार दि. 07 एप्रिल /2021 रोजी पोलीस निरीक्षक भडगाव यांना शाखा अभियंता एस.बी. गायकवाड व एन. एस महाजन ग्राम विकास अधिकारी गिरड यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत मोघम स्वरूपात पत्र दिले होते. म्हणून भडगाव पो स्टे. जा. क्र. 912/2021 दि. 12 मे 2021 नुसार सदर टी.पी मोरे यांच्या अर्ज नुसार त्याबरोबर असलेल्या चौकशी अहवालाचे अवलोकन करता त्यात अकुशल खर्च रक्कम रु. 8,20,658 व कुशल कामावर झालेला खर्च रक्कम रु. 2,68,286 संशयास्पद वाटतो. त्यामध्ये अफरातफर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असे संदिग्ध स्वरूपात नमूद केले. त्यात स्पष्ट अभिप्राय दिलेला नाही. तसेच सदर कामासाठी केलेला खर्चाचा ऑडिट रिपोर्ट, सदर कामाचे अंदाजपत्रक, सदर कर्मचारी यांची केलेली प्राथमिक चौकशी अहवाल, किंवा विभागीय चौकशी अहवाल तसेच सदर अपहाराची आपल्या विभागामार्फत चौकशी करून सदर अपहार झालेला आहे अगर नाही? असे स्पष्ट निष्कर्ष काढून संबंधिताविरूद्ध तक्रार देण्यात यावी त्याच बरोबर सदर तक्रार देते वेळी संबंधित पुरावे हे दि. 12 मे 2021 रोजी 7 दिवसात पुरावे सादर करावे तसेच आपण सदर कागदपत्रांची पूर्तता मुदतीत सादर न केल्यास आपले सदर अर्जा बाबत काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरून सदर अर्ज दफ्तरी फाईल करण्यात यावी असे स्पष्टपणे पोलीस निरीक्षक भडगाव पोलीस स्टेशन यांनी पत्र दिले होते.
परंतु टी.पी. मोरे यांनी शासकीय रकमेचा अपहार केलेल्या संशयितांना अभय देण्याचे काम केले आहे. तसेच मी ह्या प्रकरणाचा पाठ पुरावा केला नसता व दि. 21 डिसेंबर 2021 विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना तक्रार केली नसती तर हे प्रकरण आज पावेतो दफ्तरी झाल्यासारखे होते. तसेच टी.पी मोरे यांनी केलेले कृत्य हे संशयास्पद असून त्यांना पण ह्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करावे आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा 1999 कलम 3,10,11,16A,20,21,38,39,40, भा.द.वि. कलम 107, 120B नुसार गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे अन्यथा मी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे कडे याचिका दाखल करणार आहे, असेही माहिती अधिकार कार्यकर्ते सद्दाम शहा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
















