जळगाव (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. अनेक गावे पाण्यात गेली आहेत. तर महाड शहराला पुराचा वेढाच पडला आहे. एनडीआरएफचे जवान आणि प्रशासन नागरिकांना मदत आणि बचावकार्य पोहोचवत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट कोकणात महाड येथे दाखल झाले आहेत.
आमदार गिरीश महाजन हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या समवेत पोचले आहेत.
गिरीश महाजन यांनी ट्विटरवरून महाडमधील पूर परिस्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी फोटोही ट्विट केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या समवेत मी पूर ओसरल्यानंतर महाडची पाहणी केली. या ठिकाणची बाजारपेठ, बसस्थानक परिसराची परिस्थिती खूपच विदारक आहे. खासगी, शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या अकल्पनीय भीषण संकटातून सावरून उभे राहण्याचे मोठे आव्हान स्थानिक नागरिकांसमोर आहे. भाजप परिवार म्हणून आम्ही बचावकार्य व सर्वोतोपरी मदतीसाठी प्रयत्न करीत आहोत.