नवी दिल्ली (वृत्तसंस्था) या वर्षीपासून महिलांनादेखील एनडीएमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यामुळे आता राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमीमध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आतापर्यंत एनडीएमध्ये महिलांना प्रवेश नव्हता. एनडीएमध्ये फक्त मुलांना संधी देण्यात येत होती. या संदर्भातील एक याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली होती. केवळ महिला असल्यानं लिंगभेद करुन त्यांना एनडीएत प्रवेश नाकारणं हा त्यांच्या मुलभूत अधिकारांवर हल्ला आहे, असंही या जनहित याचिकेत म्हटलं होतं. त्यानंतर १८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबरला होणाऱ्या एनडीएची प्रवेश परीक्षेत पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार असा निर्णय दिला होता.
आज झालेल्या सुनावणीत एडिशनल सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी कोर्टाला सांगितले की, मी एक चांगली बातमी देणार आहे. सरकारने काल निर्णय घेतली की मुलींना एनडीए आणि नौदलात प्रवेश मिळणार आहे. जस्टिस संजय किशन कौल म्हणाले, आम्हाला आनंद होत आहे की या दिशेने आपण पहिले पाऊल टाकले आहे. भारतीय सैन्यास लैंगिक समानतेविषयी अनेक गोष्टी करण्याची गरज आहे. महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. जर हा निर्णय या अगोदर घेतला असता तर आम्हाला आदेश देण्याची गरजच पडली नसती. केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दहा दिवसांची मुदत कोर्टाने दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.