अहमदाबाद (वृत्तसंस्था) गोध्रा जळीतकांड प्रकरणामधील मुख्य आरोपीला १९ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या हत्याकांडामधील आरोपी १९ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपीचं नाव रफीफ हुसैन भटुक असून त्याला पोलिसांनी गोध्रा शहरामधून अटक केली आहे.
गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावली होती. या डब्यातील बहुसंख्य प्रवासी हे कारसेवक होते. ५९ प्रवाशांचा या घटनेत मृत्यू झाला होता. पंचमहल जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीक हुसैन भटुक हा संपूर्ण घटनेच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. गेल्या १९ वर्षांपासून तो फरार होता. एका गुप्त सूचनेनंतर पोलिसांनी सापळा रचून गोध्रा स्थानकाजवळील एका घरातून भटुक याला अटक केली, असे पाटील यांनी सांगितले. अलीकडेच त्याचे कुटुंबीय स्थलांतरीत झाल्याची माहिती मिळाली होती. आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भटुक गोध्रा येथे आला असताना, त्याला सापळा रचून अटक करण्यात आली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोध्रा जळीतकांड रचणाऱ्या गटात भटुकचा सहभाग होता. भटुक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जमा झालेल्या गर्दीमधील लोकांची माथी भडकावण्याचं आणि त्यांनंतर ट्रेनचा डब्बा जाळण्यासाठी पेट्रोल पुरवण्याचं काम केलं. या घटनेनंतर तपास सुरु झाला. त्यानंतर तपासामध्ये भटुकचं नाव समोर आल्यानंतर त्याने गोध्रामधून पळ काढला. हत्या, दंगल पसरवणे आणि इतरही अनेक आरोप भटुकविरोधात आहेत असं लीना यांनी सांगितलं आहे. गोध्रा हत्याकांड हे गुजरातमधील दंगलीसाठी कारणीभूत ठरले होते.