धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसिल कार्यालय “महाराजस्व अभियान अंतर्गत” व सक्सेस करिअर मार्गदर्शक प्रबोधिनी धरणगाव – जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ( एक दिवसीय कार्यशाळा ) आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी – विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना यशाला गवसणी घालता येत नाही. अनेकदा थोड्या फरकाने यश हुलकावणी देऊन जातं. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करिअरच्या वाटा शोधणाऱ्या विद्यार्थी बंधू – भिगिनींना एक सुवर्ण संधी चालून आली आहे. या एकदिवसीय कार्यशाळेतून विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश सुरेश चौधरी (लोकनियुक्त नगराध्यक्ष) हे आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मार्गदर्शक विनयजी गोसावी (प्रांताधिकारी-एरंडोल), नितीनकुमार देवरे (तहसिलदार धरणगाव), जनार्दनजी पवार (मुख्याधिकारी), जयपाल हिरे साहेब (पोलीस निरीक्षक), प्रथमेश मोहोड (नायब तहसिलदार) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ तहसिल कार्यालय सभागृह धरणगाव (जळगाव रोड) हे असून कार्यशाळेची वेळ १० ते ५ अशी आहे. १० ते ११ दरम्यान रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य राहील. ११ ते १२ दरम्यान कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न होईल. १२ ते ५ दरम्यान दोन सत्रात मान्यवर अतिथींचे अनमोल मार्गदर्शन लाभेल. या कालावधीत १५ ते २० मिनिटांचा चहाचा ब्रेक होईल. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू – भगिनींनी मास्क परिधान करावे, सोशल डिस्टनसिंग व कोरोना संदर्भात शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक व सक्सेस क्लासचे संचालक गुलाबराव पाटील आणि लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.