बीड (वृत्तसंस्था) दुधाळ गट योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या गाई गावात दाखल झाल्याची ग्रामपंचायतला नोंद करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून खासगी पंटरने स्वीकारली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवक हरिभाऊ रामभाऊ केदार (वय ५१, रा. धांडेनगर, बीड) व खाजगी इसम गणेश तुकाराम माने (वय ४१, रा. ताडसोना ता. बीड), अशी संशयित लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार यांचे सासूचे नावे नाविन्य पूर्ण योजना सन २०२२-२०२३ (दुधाळ गट) अंतर्गत दोन गायी मंजूर झाल्या. या योजनेअंतर्गत तक्रारदार यांचे सासूने सदर दोन गाई खरेदी केल्या होत्या. सदर गाई दुधाळ गट योजनेअंतर्गत गावात दाखल झाल्याच्या प्रमाणपत्रावर सही करून याची नोंद ग्रामपंचायतीने ठेवलेल्या गावातील पशुधनाच्या नोंदवहीत घेण्यासाठी यातील लोकसेवक यांनी पंचासमक्ष तीन हजार रुपये लाचेची मागणी करून ते पंचासमक्ष ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली.