यवतमाळ (वृत्तसंस्था) बालवयातच आई-वडीलांच छत्र हरविलेल्या एका ११ वर्षीय पिडितेवर तिच्याच आजोबांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोईद्दुीन एम.ए. यांच्या खंडपीठाने बुधवारी या प्रकरणाचा निकाल दिला असून नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दोषी हे पिडीतेचे आजोबा म्हणजे वडीलांचे वडील आहेत. घटनेच्यावेळी पिडीत बालिका ही ११ वर्षाची होती. २२ ऑक्टोबर २०१९ ला फिर्यादी पिडीताची आजी रा. बेलोरा हिने पोलीस स्टेशन घाटंजी येथे पिडीतासोबत येऊन तक्रार दिली. त्यावरून पिडीत बालिकेचे वडील जिवंत असतांना उन्हाच्या शाळेच्या सुटीत मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे पिडीता व तिची लहान बहिण आजोबाकडे एका महिन्यासाठी राहायला गेली होती. त्याठिकाणी आजोबांनी नातीवर वारंवार अत्याचार केला. दरम्यान पिडीत बालिकेच्या वडिलांचा आकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी आजोबा हे पिडीता सोबत बेलोरा येथे राहावयास आले. त्या ठिकाणी देखील आरोपीने नातीसोबत हा घाणेरडा प्रकार सुरुच ठेवला.
आजोबांकडून सतत अत्याचार होत असताना पीडिता गर्भवती झाली. पिडीत मुलीने ही गोष्ट आजोबांच्या भीतीमुळे कोणालाही सांगितली नव्हती. शाळेत १५ ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदनासाठी पिडीता शाळेत गेली व ती चक्कर येवून खाली पडली होती. त्यानंतर सरपंच व पीडितेची आजीने तिची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडिता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घाटंजी पोलिसात गुन्हा नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
















