चाळीसगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित समस्या, अडचणी व तक्रारी थेट मांडण्यासाठी आता जनतेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत चाळीसगाव येथे गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार असून, यावेळी चाळीसगावचे आमदार मा. मंगेशदादा चव्हाण तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी स्व:ता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या समस्या, तक्रारी थेट ऐकून घेत आहेत आणि त्या तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या CEO ने असा थेट जनसंपर्क आणि तक्रार निवारणासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.
या सभेसाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात आणून उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील जनतेशी निगडित ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, जलसंपदा, कृषी इत्यादी विभागांशी संबंधित प्रश्नांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
















