जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाचा विस्फोट झाला असतांनाच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जामनेर येथे अचानक भेट देऊन आरोग्य सेवेची झाडाझडती घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असतांनाच वैद्यकीय सुविधेचा बोजवरा उडालेला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील कोरोनाबाधीत रूग्ण हे कोविड केअर सेंटरमधून पळून घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तर, यानंतर एकाच दिवशी तब्बल १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याने येथील परिस्थिती अतिशय भयावह बनल्याची स्थिती जगासमोर आली होती.
या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जामनेर व पहूर येथे आश्चर्यचकित भेट दिली. त्यांनी शहरातील उपजिल्हा रूग्णालय आणि दोन खासगी रूग्णालयांमधील कोविड सेवेचा आढावा घेतला. यात त्यांनी झाडाझडती घेऊन दर्जेदार रूग्णसेवा करण्याची तंबी दिली. अनेक खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा पैशांची आकारणी करण्यात येत असतांनाच रूग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचेही दिसून आल्याने पालकमंत्री संतप्त झाले.