पाळधी /जळगाव (प्रतिनिधी) : दशमा भवानी नृत्य ही आपल्या खान्देशातील संस्कृतीची शान आहे. या पवित्र मातेच्या चरणांशी जोडलेला हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. यात्रेच्या निमित्ताने एकत्र येणं, हेच श्रद्धेचं प्रतिक आहे. भवानी मातेच्या आशीर्वादाने आपण समाजहिताची कामं करत राहणं, हीच खरी पूजा आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केले*
खान्देशातील समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृतीचा झगमगता ठेवा असलेल्या दशमा भवानी नृत्याचा अध्यात्मिक सोहळा काल पाळधी ता. धरणगाव येथे मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः यात सहभागी होत, भवानी मातेच्या भक्तिरसात रंगले. त्यांच्या सहभागामुळे यात्रेला अधिकच भक्तिमय आणि ऊर्जामय रंग चढला.
गावातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या भव्य मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. पारंपरिक पोशाख, मोरपिसाचे टोप, त्रिशूल, टिळा-काजळ, काळेभोर केस आणि मंत्रोच्चार यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिकतेने भारले होते. डोळ्यांत श्रद्धा आणि चेहऱ्यावर भक्तिभाव असलेले नृतक हे दृश्य पाहून उपस्थित भाविक भारावून गेले.
गावात झालेल्या भव्य मिरवणुकीत ढोल-ताशांचे निनाद, जय भवानीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. खान्देशातील विविध भागांतून आलेल्या भाविकांच्या सहभागामुळे यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता, लोकसंस्कृतीच्या संगमाचं प्रतीक ठरला.
















