जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि मंत्रीपदांचा शपथविधी झाल्यानंतरही पालकमंत्री पदांच्या नियुक्त्यांबाबत उत्सुकता कायम होती. विशेषतः जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मोठी चर्चा रंगली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गुलाबराव पाटील हेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत, परंतु यावेळी भारतीय जनता पक्षाने या पदावर दावा केल्याने नवे समीकरण निर्माण झाले होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर नेमके कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या यादीनुसार, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी कालावधीतही जळगाव जिल्ह्याची जबाबदारी गुलाबराव पाटील यांच्याकडेच असेल, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ना. संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे.