जळगाव (प्रतिनिधी) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खडसेंना चारी मुंड्या चित करेल नाहीतर गुलाबराव नाव लावणार नाही, असे वक्तव्य केले होते यावर एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी पलटवार करत गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका. तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब आहेत, अशी टीका खडसे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील विकास कामावरून बोलताना बाळ कुणाचे, बारसा कुणाचे, मात्र डफडं ते वाजवत असल्याचे म्हणत खडसेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आपले थोबाड खराब करू नका. माझे नाव एकनाथ हे संतांचे नाव आहे. त्यामुळे तोंडाला लावू नका. असा इशाराही खडसेंनी दिलाय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढताना दिसत आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
गुलाबराव पाटील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंवर सडकून टीका केली आहे. काही लोक माझ्याविषयी नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलवं, चारीमुंड्या चीत करूनचं हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही, असे थेट चॅलेंज गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही गद्दारांना जागा नव्हती अशी प्रतिक्रिया देत थेट एकनाथ खडसे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला.