जळगाव (प्रतिनिधी) १९ लाख रुपयांच्या गुटख्याच्या तस्करी प्रकरणात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या अजय लिलाधर गोसावी (वय ४०, रा.प्रजापत नगर) व मयुर उर्फ मनोज शालिक चौधरी (वय २६, रा. तुकारामवाडी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Jalgaon Local Crime Branch) पथकाने शहरातील प्रजापत नगरातून अटक केली. (Jalgaon Crime News)
औरंगाबाद सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Aurangabad Cidco) अजय आणि मयूरसह ११ जणांविरुध्द औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील सिडको पोलिसांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगावहून १९ लाख रुपये किमतीचा गुटखा भरुन जात असलेला ट्रक पकडला होता. यावेळी चालकाने पलायन केले होते तर क्लिनर पोलिसांच्या हाती लागला होता.
क्लिनरच्या चौकशीत हा गुटखा जळगावहून औरंगाबाद येथे आणला जात असल्याचे स्पष्ट झाले होते. क्लिनरने ११ जणांची नावे सांगितली होती. त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली होती तर चार जण फरार होते. त्यात जळगावच्या मयुर व अजय या दोघांची नावे पुढे आली होती. त्यांच्या शोधार्थ औरंगाबाद पोलिस जळगावात आले होते, अजय व मयुर २८ रोजी रात्री प्रजापत नगरात येत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक गणेश चोबे, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील व परेश महाजन यांच्यापथकाने रात्रीच दोघांना जेरबंद केले.