जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ओमशांतीनगर भागातील एका व्यापाऱ्याचा घरातून २ लाख ९५ हजार रुपये किमतीचा अनधिकृत गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. जामनेर येथील ओमशांतीनगर भागातील रहिवाशी सुरेशचंदजी सुराणा असे व्यापाऱ्याचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडे सुरेशचंदजी सुराणा यांच्या घरात अनधिकृतपणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ तंबाखुजन्य गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्या आदेशाने शनिवारी दुपारी ३ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुराणा यांच्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान त्यांच्या घरात २ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा माल आढळून आला. या प्रकरणी संबधित व्यापारी विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस नाईक किशोर राठोड, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रुपाली खरे, भरत पाटील यांचा समावेश होता.