जळगाव (प्रतिनिधी) मध्यप्रदेशातून गुटखा घेवून चाळीसगावकडे जात असलेल्या वाहनावर नशिराबाद टोल नाक्याजवळ नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये वाहनातून सुमारे २८ लाख ६८ हजार ९४० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दि. २३ एप्रिल रोजी शिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशातून (एचआर ३८, टी ५४१०) क्रमांकाच्या ट्रकमधून बेकायदेशीररित्या तंबाखू गुटखा व सुगंधित पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता नशिराबाद टोल नाक्याजवळ धडक कारवाई करत आयशर ट्रक पकडला. यावेळी पोलीसांनी वाहनाचे तपासणी केली असता त्यामध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा गुटखा, सुगंधित पान मसाला आणि तंबाखू आढळून आला. दरम्यान पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !
याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित अखिल खान सुलतान खान (वय ४८, रा. खंडवा, मध्यप्रदेश), फिरोज खान छोटू खान (वय ३६ रा. इंदौर, मध्य प्रदेश), संजय (पूर्ण नाव माहित नाही) रा. सेंधवा मध्य प्रदेश आणि करडा (पुर्ण नाव माहित नाही) रा. चाळीसगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.
पकडलेला गुटखा करडा नामक व्यक्तीचा !
मध्यप्रदेशातून गुटखा घेवून निघालेला ट्रक हा चाळीसगाव येथे जात होता. चाळीसगाव येथील करडा नामक व्यक्तीकडे हा गुटखा पोहणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. परंतु त्यापुर्वीच पथकाने त्यांच्यावर धडक कारवाई करीत गुटखा जप्त केला. दरम्यान, पोलिसांकडून चाळीसगावातील करडा नामक व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.